जागतिक महिला दिन – २०२३

गेली १० वर्षे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध माध्यमातून आपल्या विभागात कार्यरत असणाऱ्या साहेब प्रतिष्ठान गोराई संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार दिनांक ८ मार्च रोजी “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिला प्रबोधन, कर्तुत्ववान महिलांचा सत्कार, विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. बोरिवली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी घोलवे व स्मिता जाधव, माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा सौ संध्या दोषी व महिला उपविभाग संघटक सौ अश्विनी सावंत या प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होत्या. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून लोक प्रबोधन करणाऱ्या सौ शीतलताई गोरे, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या आयुर्वेदाचार्य सौ गौरी सरवणकर व राज्य तथा देश पातळीवर स्केटिंगमध्ये विविध पदकांची लयलूट करणारी कु ऱ्हित्वी पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व तुळशीरोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अचानक उपस्थित राहिलेल्या आणि कोविड काळात अथक सेवा देणाऱ्या जसलोक इस्पितळच्या हेड नर्स सौ अनघा घाडी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या स्मरणिकेचे प्रकाशन देखिल करण्यात आले. प्रमुख पाहुणे व गौरवमूर्ती यांचे आगमन होईपर्यंत बसल्या जागेवर काही खेळ खेळले गेले व त्यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच उपस्थित महिलामधील लकी ड्रॉ द्वारे 3 महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाची आठवण म्हणून सौ संध्या विपुल दोशी यांच्याकडून आठवण भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती ज्योती भंडारी, प्रास्ताविक सौ संगीता नलावडे, आभार प्रदर्शन कु प्रियंका साळगावकर यांनी केले. विविध खेळाचे सूत्र संचालन कु अंकिता चव्हाण यांनी केले.

Scroll to Top