ध्येय आणि धोरणे

१. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि गरजूंना अर्थसहाय्य

           मराठी माध्यमातून शिकत असलेल्या हुशार पण आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासून शिष्यवृत्ती देण्याचा मनोदय आहे.

           कोरोना काळात विभागातील ८६ कुटुंबांना त्यांच्या घरातील चुली पेटत राहाव्यात यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे साधारण महिनाभर पुरतील असे किट वाटण्यात आले. हे व्रत आजही सुरू आहे.

२. जागतिक महिला दिनी महिला प्रबोधन

           आपल्या पायावर उभे राहण्यासोबत समाजातील इतर महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी किंवा समाजासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या विभागातील काही कर्तुत्ववान महिलांना ८ मार्च या जागतिक महिला दिनी गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात येतो. तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. समाजातील इतर महिलांनी त्यांचा आदर्श गिरवावा, एवढाच उद्देश्य असतो. प्रतिवर्षी उपस्थित राहणाऱ्या साधारण २०० महिलांना महिला दिनाची आठवण भेट देण्यात येते. 

३. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

           युवा पिढीत पसरत चाललेल्या इंग्रजी नववर्ष स्वागताचे खूळ कमी करता येणार नाही पण त्यांना आपल्याही नववर्ष स्वागताचे मधुर क्षण अनुभवता यावेत यासाठी प्रत्येक वर्षी गुढीपाडव्या निमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. लेजिम, वारकरी भजन, बैलगाड्या, घोडे, वेशभूषा केलेली मुले आणि जात-पात, पंथ, संप्रदाय, पक्ष ही भेदाभेद गाडून पारंपारिक वेशात आलेली जनता या यात्रेचे वैशिष्ट्य असते. यात्रेत सामील झालेल्या ३ महिलांना उत्तेजन देण्यासाठी लकी ड्रॉ द्वारे ३ पैठणी साड्या प्रदान करण्यात येतात. तसेच संस्थेच्या प्रवेशद्वारी गुढी उभारून सुबक रांगोळी काढणाऱ्या किंवा यात्रेत एनकेन प्रकारे बहुसंख्येने समाविष्ट झालेल्या संस्थांना स्मृतिचिन्ह देण्यात येते. 

४. बालसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर

           वय वर्षे ६ ते १२ मधील मुलांसाठी १५ दिवसांचे हे शिबिर असते. यात विविध स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यासोबत विस्मृतीत गेलेले खेळ तथा अभ्यासक्रमा बाहेरील कला जसे की क्राफ्टिंग, अभिनय, संभाषण शिकविल्या जातात. प्रतिवर्षी साधारण ७५ मुले या शिबिराचा लाभ घेतात. शिबिराची सांगता ही शैक्षणिक सहल आणि आठवण भेट देऊन करण्यात येते. 

५. रांगोळी प्रशिक्षण शिबिर

           विभागातील महिलांना सहज साध्य होईल अशी संस्कार भारती रांगोळी काढता यावी यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी साधारण ५०-६० महिला या शिबिराचा लाभ घेतात. 

६. दुर्ग बांधणी स्पर्धा

           दिवाळीत किल्ले बांधण्याची पूर्वापार संस्कृती जपली जावी, युवकांच्या मनात इतिहासाबद्दल प्रेम जागृत व्हावे आणि ते टिकावे यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. परिसरात २०० ते २५० चौरस फुटाचे किल्ले बांधले जातात. या स्पर्धेतील किल्ले पाहायला मुंबई बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक चारकोप, गोराई परिसरात येतात. प्रतिवर्षी साधारण ३०-३५ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. गेल्या काही वर्षात चारकोप, गोराई परिसरातील असंख्य समूह दुर्ग संवर्धन कार्यात योगदान देऊ लागले आहेत आणि दुर्गभ्रमंती करू लागले आहेत, हे आमच्या विचारांचे यश आहे असे आम्ही समजतो.  

७. राष्ट्रीय पातळीवर व्यंगचित्र स्पर्धा

           जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वय वर्षे १४ पर्यंत एक आणि १४ वर्षा पुढील दूसरा अशा दोन गटात ही स्पर्धा होते. महाराष्ट्रा बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात.  

८. विविध लोक प्रबोधन कार्यक्रम आणि राष्ट्रीय सण

               ऑनलाइन अथर्वशीर्ष पठण तथा पसायदान पठण स्पर्धा, अभिनय स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठीतून वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतात. 

                  पथनाट्याद्वारे आणि विविध संस्थांना भेट देऊन घनकचरा विलगीकरणा बाबत समाज प्रबोधन करण्यात आले.  

पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र यांचे शिबिर तथा राष्ट्रीय सण हे सर्व वर्षभर समाजकारणात व्यस्त राहण्याचे आमचे स्त्रोत आहेत. 

               

Scroll to Top